केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या वतीने जिल्ह्यात कृषीतंत्रज्ञानाची जनजागृती गावोगावी करण्यासाठी विकसित कृषी संकल्प अभियान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ-१, कृषी विभाग आत्मा, यवतमाळ, अक्शन फॉर फूड प्रोडक्शन (अफ्रो), यवतमाळ, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र, नागपूर व ईफको यांचे संयुक्त विद्यमाने दि. २९ मे २०२५ पासून ते १२ जून २०२५ या १५ दिवसांच्या कालावधीत कृषीतंत्रज्ञानाची जनजागृती तसेच नवीन पिक प्रकार आणि शासकीय योजनांची माहिती तसेच मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या यवतमाळ, कळंब, बाभूळगाव, राळेगाव, घाटंजी, मारेगाव, वणी, केळापूर, झरी – जामनी या ९ तालुक्यातील प्रत्येक दिवशी प्रत्येक तालुक्यातील तीन गावांमध्ये विकसित कृषी संकल्प अभियान राबवीत येत आहे.
या अभियाना दरम्यान शास्त्रज्ञ शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधत असून, सदरील अभियानाला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या अभियाना दरम्यान दररोज दोन फिरत्या कृषी रथांच्या माध्येमातून ११०० ते १२०० शेतकरी बांधवांशी थेट संपर्क साधून कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येत आहे.
या अभियाना प्रसंगी कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ-१, कृषी विभाग आत्मा, यवतमाळ, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र, नागपूर, अक्शन फॉर फूड प्रोडक्शन (अफ्रो), यवतमाळ व ईफको यांचे शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून प्रत्येक दिवशी प्रत्येक तालुक्यातील तीन गावांमध्ये जावून शेतकरी बांधवांना येणाऱ्या खरीप हंगामात पिक लागवड, रुंद वरंबा सरी पद्धत, कापूस पिकामध्ये अति सघन लागवड पद्धत, बीज प्रक्रिया, तण व्यवस्थापन, फवारणी दरम्यान घ्यावयाची काळजी, रोग व कीड व्यवस्थापन व कृषी विभागाच्या सर्व शासकीय योजना या विषयांवर मार्गदर्शन व माहिती देत आहेत. यैन खरीप हंगामाच्या मुहूर्तावर या अभियानामुळे शेतकरी बांधवांना चांगले मार्गदर्शन लाभले व लाभत आहे. या बाबत शेतकरी बांधव प्रोत्साहित होवून या अभियानास प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहे.