डॉ. पंदेकृवि, अकोला व युपीएल, मुंबई यांचे संयुक्त प्रकल्पांतर्गत शेतकरी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रम सायखेडा खुर्द येथे संपन्न

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला व युपीएल, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने यवतमाळ तालुक्यातील सायखेडा खुर्द गावातील १४५ एकर क्षेत्रावरील कापूस पिकावरील प्रकल्पाअंतर्गत आज दि. २६.०७.२०१८ रोजी कपाशीवरील किडींचे तसेच गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापण, एकात्मिक पीक व्यवस्थापन व कामगंध सापळ्यांचा वापर याविषयावर शेतकरी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या शेतावर गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्यांच्या वापराविषयी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. कपाशीचे पिक ७० दिवसांचे होईपर्यंत शेत तणमुक्त कसे ठेवता येईल या संबधी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाविषयी पुढील प्रमाणे उपाय योजना करण्याचे आवाहान करण्यात आले.

 

 • मृद परीक्षणाच्या आधारावर खतमात्रेचा अवलंब करून नत्र युक्त खतांचा अवाजवी वापर टाळावा. जेणे करून पिकाची अनावश्यक कायिक वाढ होणार नाही व पिक दाटणार नाही याची काळजी घ्यावी.
 • बांधावरील तसेच शेताच्या सभोवताली असणाऱ्या किटकाच्या पर्यायी खाद्य वनस्पती (अंबाडी, रानभेंडी) नष्ट कराव्यात.
 • शेतात पक्षी थांबे उभारावेत ज्यामुळे त्यावर पक्षी बसून अळ्या/ किडी टिपून खातील.
 • कपाशीच्या शेतात सुरवातीच्या पाते फुले लागण्याच्या कालावधीत एकरी किमान ३ कामगंध सापळे लावावेत.
 • फुले व बोंडे लागण्याच्या कालावधीत मोठ्या संख्येने नर पतंग जेरबंद करण्यासाठी प्रती एकर १० ते १२ कामगंध सापळे लावावेत व सापळ्यात अडकलेले पतंग वेळच्या वेळी नष्ट करावेत. दोन कामगंध सापळ्यातील अंतर ५० मीटर ठेवावे. कामगंध सापळे पिकापेक्षा एक-दीड फूट उंचीवर लावावेत आणि लिंग प्रलोभने कालबाह्य झाल्यास बदलावीत. या सापळ्यामध्ये २ ते ३ दिवस सतत ८ ते १० पतंग आढळून आल्यास त्वरित व्यवस्थापनाचे उपाय योजावेत.
 • शेतात प्रकाश सापळे हेक्टरी ४ ते ५ लावावेत.
 • बोंडअळीग्रस्त फुले/ डोमककळ्या आढळल्यास अशी फुले त्वरित तोडून अळीसह नष्ट करावे.
 • बोंडअळ्यांची अंडी किंवा प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या पिकावर दिसू लागताच ट्रायकोग्रामा ब्याक्र्टी किंवा ट्रायकोग्रामा चीलोणीस या परोपजीवी किटकाची १ ते १.५ लाख अंडी या प्रमाणात दर आठवड्याने तीन ते सहा वेळा कपाशीच्या शेतात सोडावीत. या कालावधी मध्ये कोणतेही किडनाशक फवारू नये.
 • गुलाबी बोंड अळीचा प्राथमिक स्वरूपाचा प्रादुर्भाव दिसताच निंबोळी अर्क ५ % या वनस्पती जन्य किटकनाशकाची किंवा अझाडीरेक्टीन १५०० पीपीएम @ ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 • बिव्हेरिया बेसियाना १.१५% विद्राव्य भुकटी ५० ग्राम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून शेतात आद्रता असतांना फवारणी करावी. रासायनिक कीटकनाशकांचा वापर शेवटचा पर्याय म्हणून करावा.
 • पांढरी माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सिन्थेटिक पायरेथ्रोइड गटातील तसेच मिस्र कीटकनाशकांचा वापर टाळावा.
 • गुलाबी बोंड अळीचे रासायनिक व्यस्थापन : किडींच्या सर्वेक्षणाअंती गुलाबी बोंडअळ्यांनी ५-१० % किडग्रस्त पात्या, फुले, बोंडे किंवा कामगंध सापळ्यात सरासरी ८ ते १० नर पतंग सतत दोन ते तीन दिवस हि आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यावरच कोणत्याही एका लेबल क्लेम निहाय शिफारशीत कीटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याविषयी कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ-१ येथील शास्त्रज्ञानी मार्गदर्शन केले.

 

महत्वाची सूचना:

 • कीटकनाशकाच्या मात्रा केंद्रीय कीटकनाशक मंडळ, फरीदाबाद यांच्या शिफारशीनुसार आहेत.
 • किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच किडनाशकांची फवारणी शिफारशीत मात्रेत शेवटचा पर्याय म्हणून करावी. फवारणी करतांना अंगरक्षक कपडे, चस्मा, हातमौजे, टोपी, मास्क वापरूनच फवारणी करावी.
 • एकाच कीटकनाशकाची वारंवार फवारणी करणे टाळावे. पुढील फवारणी किडीने आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यास १५ दिवसांच्या अंतराने करावी.
 • कीटकनाशकामध्ये इतर कोणतेही रसायन मिसळून फवारणी करू नये.