महमदपूर या गावामध्ये माती परीक्षण कार्यक्रम संपन्न-18.05.2023

डॉ . पंजाबराव  देशमुख कृषी विद्यापीठ अकोला- कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ-१ यांचे अंतर्गत मौजे महमदपूर तालुका बाभुळगाव या गावाची निवड मॉडेल व्हिलेज  संकल्पनेने करण्यात आली आहे. या गावाचा  सर्वांगीण विकास करण्याकरिता कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, उमेद , आत्मा व इतर  शासकीय  विभाग तसेच  रिलायन्स फाउंडेशन, इफको  यांचे संयुक्त विद्यमाने व सहकार्याने विविध योजनांचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने  दिनांक १८ मे, २०२३ रोजी मौजे महमदपूर या  गावामध्ये कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ -१ व रिलायन्स फाउंडेशन आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्येमाने  माती परीक्षण जनजागृती  कार्यक्रम राबविण्यात आला.   

              याप्रसंगी डॉ . सुरेश नेमाडे, कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ -१ यांनी मातीचा नमुना योग्य पद्धतीने कसा काढावा. कोणती काळजी घ्यावी व माती परीक्षण करण्याचे फायदे तसेच माती परीक्षणाधारित खत व्यवस्थापन करावे असे आवाहन केले. तसेच श्री  सुरेश  गावंडे, तालुका कृषी अधिकारी, बाभुळगाव यांनी विविध शासकीय कृषीविषयक योजनाबद्दल शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. सरपंचाचे प्रतिनिधी श्री. सुनीलभाऊ काळे यांनी विद्यापीठाचे आधुनिक तंत्रज्ञान गावातील शेतकऱ्यांनी स्वीकारावे व वेळोवेळी कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी विनंती केली. श्री. प्रफुल  बनसोड, अधिकारी, रिलायन्स फाउंडेशन यांनी रिलायन्स फाउंडेशन च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या  डिजिटल  शेतीशाळा या उपक्रमाविषयी माहिती दिली.

              तांत्रिक मार्गदर्शनामध्ये कृषी विज्ञान केंद्रातील विविध विभागाच्या विषयतज्ञ यांनी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी माहिती दिली. यावेळी श्री. मयूर ढोले, विषयतज्ञ, विस्तार शिक्षण  यांनी गावात राबविण्यात येणारा  कृती आराखडा या विषयी माहिती दिली. डॉ. प्रमोद मगर, विषयतज्ञ, कीटकशास्त्र यांनी खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे बीज प्रक्रीयाचे महत्त्व या विषयी माहिती दिली सोबतच गावामध्ये जैविक प्रयोगशाळा निर्मितीसाठी कृषी विभागाची मदत घेणेबाबत सूचना केल्या. डॉ. गणेश काळूसे, विषयतज्ञ पशुसंवर्धन व दुग्धशात्र यांनी पशुपालन व्यवस्थापन व चारा  व्यवस्थापन या विषयी माहिती दिली. श्री. राहुल चव्हाण, विषयतज्ञ, कृषी अभी. यांनी आधुनिक कृषी अवजारांचा शेतीमध्ये वापर या विषयी माहिती दिली तसेच बी बी एफ या यंत्राचा मोठया प्रमाणात वापर करण्याचे सुचविले. श्रीमती स्नेहलता भागवत, विषयतज्ञ, गृहविज्ञान यांनी महिलांचे आरोग्य व्यवस्थापन, प्रक्रिया उद्योग या विषयी माहिती दिली.

              श्री. उमेश बागडकर, कृषि सहायक,  कृषी विभाग, बाभुळगाव  यांनी शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या शासकीय योजनानाचे अंमलबजावनी करतांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याविषयी मनोगत व्यक्त केले.  यावेळी सदरील कार्यक्रमास गावातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी ३४ शेतकऱ्यांनी  माती परीक्षनाकरिता मातीचे  प्रातिनिधिक नमुने कृषी विज्ञान केंद्र या कार्यालयाकडे जमा केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मौजे महमदपूर या गावातील शेतकरी बांधवांनी मोठया संख्येने सहभाग नोंदविला व कृषी विज्ञान केंद्राचे श्री. अमोल कडू व श्री. भरतसिंग सुलाणे यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *