डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यासाठी कार्येरत असलेल्या कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ व नवनिर्माण महिला ग्रामसंघ एकलारा (उमेद) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेतकरी शास्त्रज्ञ मंच’ च्या पाचव्या सभेचे आयोजन व ‘राष्ट्रीय मत्स्यदिवस’ दिनांक : १०-०७-२०२३ रोजी मौजे एकलारा ता. राळेगाव येथे साजरा करण्यात आला.
याप्रसंगी उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त मा. श्री. जगदीशभाऊ चव्हाण, गाझीपुर, अध्यक्ष, शेतकरी शास्त्रज्ञ मंच, मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्र प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, मा. अजय मेश्रे, सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, यवतमाळ, उमेद चे श्री. धनवंत शेंडे व श्री. मिलिंद चोपडे अधिकारी तसेच कृषी विज्ञान केंद्राचे श्री. मयुर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण, डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनपर मा. श्री. जगदीशभाऊ चव्हाण, गाझीपुर, शेतकरी शास्त्रज्ञ मंच अध्यक्ष, यांनी महिलांच्या गटांमार्फत प्रक्रिया उद्योगांना चालना द्यावी या करिता कृषी विज्ञान केंद्राशी आपण प्रक्रिया उद्योगा करिता संपर्क करावा असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे उद्देश व महत्त्व विषद केले. या दरम्यान उमेदच्या कृषी सखी श्रीमती. माया पाझरे व श्रीमती. ज्योत्स्ना गेडाम, राळेगाव यांनी आपले अनुभव कथन केले.
कार्यक्रामाचे आयोजक प्रगतशील शेतकरी (मत्स्यव्यवसाय) तथा शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य मा. श्री. गजुभाऊ आत्राम, एकलारा ता. राळेगाव यांनी सर्व उपस्थित शेतकरी बांधवांचे स्वागत करून, शेतीपूरक करीत असलेल्या मत्स्यव्यवसाय या नाविण्यपूर्ण उपक्रमांबद्दल तसेच घेत असलेले उत्पादन व उत्पन्न याबाबत मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी प्रगतशील व नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या शेतावर राबवीत असेलेल्या उपक्रमांविषयी श्री. कृष्णाभाऊ दशेट्टीवार, पांढरकवडा, श्री. हरिषभाऊ काळे, रिधोरा यांनी सखोल माहिती दिली.
तांत्रिक सत्रामध्ये मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्र प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी शेतीतील उत्पादन व उत्पन्न वाढवण्याकरिता विद्यापीठाचे विकसित तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन केले. तसेच आर्थिक उत्पन्न करिता शेतीला पूरक व्यवसायाची सांगड घालावी या विषयी सखोल मार्गदर्शन केले.
मा. अजय मेश्रे, सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, यवतमाळ यांनी राष्ट्रीय मत्स्यदिवसाचे महत्व सांगून, मत्स्य विभाग राबवीत असलेल्या शासकीय योजनां विषयी माहिती दिली.
डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी महिला बचत गटाच्या आर्थिक उत्पन्न निर्मिती करिता पिवळे चिकट सापळे, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क व्यवसाय उभारावे या विषयी मार्गदर्शन केले.
उमेद चे अधिकारी श्री. धनवंत शेंडे यांनी शासकीय विमा योजना विषयी तर श्री. मिलिंद चोपडे यांनी प्रक्रिया उद्योगा विषयी सखोल माहिती दिली.
सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती. प्राजक्ता गेडाम यांनी केले तर आभार श्रीमती. ललिता ससाणे, रिधोरा यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नवनिर्माण महिला ग्रामसंघ एकलारा (उमेद) च्या पदाधिकार्यांनी व एकलारा येथील शेतकरी बांधवांनी सक्रीय सहभाग नोंदविला.