कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ मार्फत जनावरावरील लंपी स्कीन आजाराबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन

ग्रामीण भागात जनावरावरील लंपी स्कीन डिसीजचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याबाबत पशुपालकांनी सतर्कता बाळगून जनावरांवर उपचार करावे, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ मार्फत केले आहे. लंपी हा आजार विषाणूजन्य आहे. अत्यंत संसर्गजन्य आजार देवी विषाणू गटातील कप्रीपाक्स प्रवर्ग आहे. या रोगाचा प्रसार चावणाऱ्या माश्या, गोचीड, चिलटे, बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने किंवा दुषित चारा व पाण्यामुळे होतो. या रोगाची लक्षणे हि अंगावर १० ते ५० मिमी व्यासाच्या गाठी, सुरवातीस भरपूर ताप, डोळे, नाकातून चिकटस्त्राव, चारापाणी खाणे बंद किंवा कमी, दुथ उत्पादन कमी, काही जनावरात पायावर सूज येऊन लंगडणे आदी लक्षणे दिसतात. या रोगावर नियंत्रणासाठी गोठ्यामध्ये डास, माश्या, गोचीड होणार नाही याची दक्षता घ्यावी. जनावरांवर उपचार करताना नवीन सिरींज निडलचा वापर करावा. गोठ्यामधील बाहेरील व्यक्ती, डॉक्टर येणार असतील तर सर्व प्रथम त्यांचे निर्जंतुकीकरण करावे. तसेच साथीचा आजार सुरु असेपर्यत बाजारातून जनावरांची खरेदी विक्री थांबवावी. रोगावर नियंत्रणासाठी बाधित जनावरे तात्काळ वेगळे करावे, गोठ्यामध्ये सोडियम हायपोक्लोराईड, फिनाईलची फवारणी करावी, जनावरांना आयव्हरमेक्टीन इंजेक्शन दिल्यास कीटक गोचीड यांचे नियंत्रण होते. गावामध्ये कीटकनाशक औषधाची फवारणी करावी. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. सुरेश नेमाडे यांनी आपल्या पशुधनाची योग्य ती काळजी घ्यावी तसेच पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे विषय विशेषज्ञ डॉ. गणेश यु. काळूसे यांनी गोठ्यातील स्वच्छता, जनावरांचे बाह्य परोपजीवी नियंत्रण आणि प्रामुख्याने लहान वासरे यांचे योग्य ती काळजी घ्यावी व  लंपी आजाराची लक्षणे दिसल्यास ताबडतोब नजीकच्या पशुवैधकीय डॉक्टर यांना कळवावे व त्यांच्याकडून औषधोपचार करून घ्यावे असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *