कापूस पिक उत्पादन वाढीसाठी शेतीला अधुनिक तंत्रज्ञानाची जोड महत्त्वाची – डॉ. सी. डी. मायी 02.09.2023 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला – कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, ॲग्रोव्हिजन फाउंडेशन, नागपूर, साउथ ऐशिया बायोटेक्नोलॉजी सेंटर, जोधपुर आणि कृषी विभाग, यवतमाळ  यांचे संयुक्त सहकार्याने  कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन बंधन प्रकल्पांतर्गत बाभुळगाव तालुक्यातील महमदपूर गावात ६० एकरवर PB Knot बंधन बांधण्याचा कार्यक्रम   राबविण्यात आला आहे.  

              या अनुषंगाने दिनांक: ०२ सप्टेंबर, २०२३ रोजी बाभुळगाव तालुक्यातील श्री सिध्देश्वर शिव मंदिर, सरूड येथे शेतकरी बांधवानकरिता “शेतकरी मेळावा”  संपन्न झाला.

              सदर मेळावाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. शुभाषचंद्रजी  आचलीया, मार्गदर्शक, श्री सिध्देश्वर शिव मंदिर, सरूड, बागवाडी, ता. बाभुळगाव जिल्हा यवतमाळ  तर प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक मा. डॉ. सी. डी. मायी, माजी कुलगुरू तथा सचिव ॲग्रोव्हिजन फाउंडेशन, नागपूर हे होते. सदर मेळाव्यास  मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्र प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ, श्री. सुरेश गावंडे, तालुका कृषी अधिकारी, बाभुळगाव, मा. सौ. ज्योतीताई काळे, सरपंच, महमदपूर,  मा. डॉ. दीपक जाखर, साउथ ऐशिया बायोटेक्नोलॉजी सेंटर, जोधपुर, मा. डॉ. आर. डी. सातभाई, सहा. प्रा. वसंतराव नाईक जैव तंत्रज्ञान महाविद्यालय, यवतमाळ, मा. श्री. कृष्णा ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य, महमदपूर, मा. श्री. रवि मानकर, इंडो ग्लोबल, वर्धा, कृषी विज्ञान केंद्रातील मा. श्री. मयुर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण, मा. डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र,  श्री. राहुल चव्हाण, शास्त्रज्ञ, कृषी अभियांत्रिकी, डॉ. गणेश काळूसे, शास्त्रज्ञ, पशुसंवर्धन मान्यवर  उपस्थित होते.

              कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक मा. डॉ. सी. डी. मायी, सचिव, ॲग्रोव्हिजन फाउंडेशन, नागपूर यांनी कापूस पिकातील यांत्रिकीकरणाचे महत्व, पी.बी. नॉट टेक्नोलॉजी व उपयोग तसेच आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी गाव पातळीवर शेतकरी गटाच्या माध्यमातून एकत्रित यावे तसेच गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाबाबत महमदपूर गावामध्ये राबविण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट बंधन’ मधील अधुनिक तंत्रज्ञानाचा (पी.बी. नॉट टेक्नोलॉजी) अवलंब कपाशी पिकासाठी सामूहिकरीत्या करण्याचे अवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक तथा मार्गदर्शनपर  मा. डॉ. सुरेश उ. नेमाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्र प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी बंधन प्रकल्पाचे उद्देश व महत्त्व तसेच कापूस पिकाच्या वाढीसाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयी मनोगत व्यक्त केले.

              कार्यक्रमाचे अतिथीपर  श्री. सुरेश गावंडे, तालुका कृषी अधिकारी, बाभुळगाव यांनी कृषी विभागाच्या शासकीय योजना व शेतकरी बांधवांनी उत्पन्न वाढविण्यासाठी विद्यापीठाच्या शिफारसीत तंत्रज्ञानाचा वापर करावा या विषयी माहिती दिली. या प्रसंगी सुरक्षित फवारणी जन जागृती  करिता सिजेन्टा कंपनीच्या वतीने निवडक शेतकरी बांधवांना सुरक्षित फवारणी कीट चे वाटप मान्येवरांच्या  हस्ते करण्यात आले. या दरम्यान डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र यांनी सुरक्षित फवारणी करिता घ्यावयाची काळजी व सध्या कापूस पिकाचे कीड व रोग व्यवस्थापन या विषयी सखोल मार्गदर्शन केले.

             मा. सौ. ज्योतीताई काळे, सरपंच, महमदपूर यांनी उपस्थित शेतकरी बांधवांनी  वेळोवेळी कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञाशी संपर्कात राहून विद्यापीठाच्या शिफारशीत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा अशी विनंती केली, कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महमदपूर गावातील समस्त शेतकरी बांधवांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमासाठी बाभूळगाव तालुका परिसरातील शेतकरी बांधव मोठया संख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. मयूर ढोले, शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण तर आभार डॉ. प्रमोद मगर, शास्त्रज्ञ, कीटकशास्त्र यांनी केले.