विद्यापीठ शास्त्रंज्ञाच्या सल्ल्याने शेतीचे नियोजन करून अनावश्यक खर्च टाळावा

           यवतमाळ, दि. २३/०७/२०२०: खरीप हंगामातील कपाशी, सोयाबीन आणि तूर इत्यादी मुख्य पिकांकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करूनच शेतीचे नियोजन करावे आणि नको त्या कीटकनाशकांच्या जादा फवारण्या तसेच रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर टाळून त्यावर होणारा अनावश्यक खर्च कमी करावा, असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळचे कार्यक्रम समन्वयक तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस.यु. नेमाडे यांनी केले. यासाठी विद्यापीठ तथा कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, शासनाच्या कृषि विभागाचे अधिकारी आणि गावातील प्रगतिशील शेतकरी यांचा सल्ला घेवूनच शेती करणे आणि कोविड-१९ च्या महामारीमुळे उद्भवलेल्या स्थितीनुरूप खर्च कमी करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ आणि रिलायन्स फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने ‘कपाशीमधील खत आणि कीड –रोग व्यवस्थापन’ या विषयावर दि. २३ जुलै २०२० रोजी आयोजित यु ट्यूब लाइव्ह कार्यक्रमात शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना ते बोलत होते. कपाशीची लागवड व व्यवस्थापन, तणनाशाकांची निवड आणि वापर, आंतरमशागत, चिबड जमिनीत कपाशीची काळजी, इत्यादी विषयांवर शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. नेमाडे यांनी उत्तरे दिली.
                डॉ. पं. दे. कृ. वि., अकोलाच्या मृद विज्ञान आणि कृषि रसायनशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. डी.एस. कंकाळ यांनी ‘कपाशी पिकातील खत व्यवस्थापन’ या विषयावर शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. या प्रसंगी कपाशीच्या उत्पादन वाढीसाठी नत्र, स्फुरद व पालाश या मुख्य अन्नद्रव्यांचा पुरवठा कपाशीला वेळेत करण्यासाठी शिफारस केलेली रासायनिक खतांची पहिली मात्रा पेरणीचे वेळीच देण्याचे आवाहन डॉ. कंकाळ यांनी केले. बहुतांश शेतकरी शिफारसीत खतांच्या मात्रा वेळेत देत नसल्यामुळे कपाशीची वाढ व्यवस्थित होत नाही आणि कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढतो; तसेच उशिरा खते दिल्यामुळे त्यामधील अन्नघटकांची कार्यक्षमता कमी होवून पिकाला ती पूर्णपणे उपलब्ध होत नाहीत व पर्यायाने अनावश्यक खर्चदेखील वाढतो असेही ते म्हणाले. कोविड-१९ च्या महामारीमुळे उद्भवलेल्या रासायनिक खतांच्या टंचाईवर मात करण्यासाठी घाबरून न जाता फवारणीद्वारे कमी प्रमाणात खते वापरून सर्व अन्नद्रव्यांचे यशस्वी नियोजन कसे करावे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
                कृषि विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्र विशेषज्ञ डॉ. प्रमोद मगर यांनी कपाशीमधील रस शोषक किडी, गुलाबी बोंडअळी, आकस्मिक मर इत्यादी विषयांवर शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. एकात्मिक पद्धतीने सर्व कीड व रोगांचे व्यवस्थापन करतांना निंबोळी अर्क, पिवळे चिकट सापळे, फेरोमन सापळे, पेरणीपूर्व बीज प्रक्रिया इत्यादी बाबींचा योग्य वेळेनुसार आणि योग्य पद्धतीने वापर केल्यास कमी खर्चात प्रभावीपणे कीड व रोग व्यवस्थापन होवून उत्पादनात वाढ होते, असेही त्यांनी सांगितले.
               कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्यातील कळंब, राळेगाव, घाटंजी, बाभुळगाव, नेर, यवतमाळ, आर्णी, पुसद इत्यादी तालुक्यातील विविध गावांमधून १२९ शेतकरी सहभागी झाले होते. त्यापैकी २० शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले. कार्यक्रमाचे संचालन रिलायन्स फाउंडेशनचे कार्यक्रम अधिकारी प्रफुल्ल बन्सोड यांनी केले व जिल्हा कार्यक्रम सहाय्यक प्रशांत ढेपे यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *